जळगाव-प्रतिनिधी | जळगाव शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली असून शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरातील नीलेश नरेश हंसकर आणि इंद्रप्रस्थनगरातील दीपक दगडू भोई या दोघांना एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी हे आदेश काढल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नीलेश हंसकरविरोधात शहरातील शनिपेठ पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दीपक भोईविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्याच्यावरही दोनदा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात घेता या दोघांकडून आणखी गंभीर गुन्हा घडू नये म्हणून शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या वतीने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो संबंधित विभागाला पाठवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. चौकशी अहवाल मिळाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी दोघांना हद्दपार करण्याचे आदेश दिले.
सध्या जळगाव शहरातून हद्दपारीची एकूण 32 प्रकरणे प्रलंबित असून त्यातील दोन प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. उर्वरित 22 प्रकरणांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे तर आठ प्रकरणांची चौकशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सुरू आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून पुढील काळात गुन्हेगारी नियंत्रणासाठी आणखी कडक पावले उचलली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळते.