व्यवसायातील तोटा दर्शवण्यासाठी रेल्वेत टाकला बनावट दरोडा : चौकडी रेल्वे सुरक्षा बलाच्या जाळ्यात

Bhusawal Railway Protection Force takes major action: Fake robbery of Rs 2 crores in Garibrahth Express exposed: Four people including bullion trader arrested भुसावळ (5 ऑक्टोबर 2025) : सराफा व्यवसायात तोटा आल्याचे दर्शवण्यासाठी सराफा व्यापार्‍याने आपल्या मित्रांना सोबत घेत दरोड्याचा प्लॅन केला व खंडवा-भुसावळदरम्यान गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये लूट झाल्याचा बनाव करीत गुन्हा दाखल केला. या दरोड्यात तब्बल एक कोटी 82 लाखांचे सोने चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र भुसावळ रेल्वे सुरक्षा बलासह खंडवा रेल्वे सुरक्षा बलाने तांत्रिक तपासाअंती दरोड्याचा बनाव उधळत तक्रारदार सराफासह त्याच्या मित्रांना बेड्या ठोकत लूट केलेला तब्बल एक कोटी 82 लाखांचा ऐवज जप्त केला.

यांना आरोपींना अटक
सागर पारेख (40, नाशिक), संजय कुमार (27, पाली, जि.राजस्थान, ह.मु.मुंबई), प्रवीण कुमार (35, सिरोही जिल्हा, राजस्थान, ह.मु.दिवा ईस्ट, ठाणे) व राकेश जैन (53, मलबार हिल्स, मुंबई) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

असा रचला बनावट दरोड्याचा डाव
बनावट दरोड्यातील मास्टर माईंड राजेश पारेख आहेत. तो मुंबईच्या झवेरी बाजारात आर.बी.ज्वेलर्स व गोल्ड लिमिटेडमध्येमध्ये भागीदार आहे. व्यवसायात तोटा दर्शवण्यासाठी त्याने मित्रांना सोबत घेत रेल्वेत दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला व त्यासाठी तीन मित्रांना काही रक्कम देण्याचे आमिष देत तयार केले.

संशयीत 30 सप्टेंबर रोजी गाडी क्रमांक 12187 जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेसने प्रवास करीत असताना त्यांनी संशयीतांनी मारहाण करीत सोबत असलेल्या 52 सोन्याच्या बांगड्या आणि 35 सोन्याच्या अंगठ्या मिळून एकूण 1.5 किलोग्रॅम वजनाचा व एक कोटी 82 लाखांचा ऐजव लूटल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) ठाण्यात दिली मात्र गुन्ह्याचे कार्यक्षेत्र जीआरपी, पोस्ट खंडवा यांच्या कार्यक्षेत्रात आल्याने हा गुन्हा खंडवा येथै वर्ग करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषणात गुन्हा उघड
विभागीय सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ पोस्ट खंडवा, गुन्हे गुप्त वार्ता शाखा आणि आरपीएफ भुसावळ येथील अधिकार्‍यांचा समावेश असलेली एक संयुक्त तपास पथकाची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण, डिजिटल ट्रॅकिंग, मोबाईल कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि मार्ग नकाशांकन यांसारख्या आधुनिक तपास साधनांचा प्रभावी वापर करून पथकाने घटनेचे सखोल तांत्रिक विश्लेषण केले. तपासातून उघड झाले की, कथित दरोडा पूर्णपणे बनावट असून तो फिर्यादीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने अधिकार्‍यांना दिशाभूल करून खोटा तोटा दाखविण्याच्या उद्देशाने आखला आहे.

आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
तक्रारदाराला बोलते केल्यानंतर त्याने खोट्या कथेला विश्वसनीयता देण्यासाठी स्वतःला जाणूनबुजून दुखापत केल्याचे मान्य केले व लूट केलेले सोन्याचे दागिने त्यांनी आपल्या साथीदार प्रवीणकडे कल्याण रेल्वे स्थानकावर सुपूर्द केल्याचे मान्य केले. संशयीताला खंडवा पोलिस ठाण्यात बोलावल्यानंतर त्याने 4 रोजी 52 सोन्याच्या बांगड्या व 35 सोन्याच्या अंगठ्या असा एकूण एक कोटी 82 लाखांचा ऐवज जमा केला. चार आरोपींना अटक करण्यात आली असून तपास आरपीएफचे निरीक्षक प्रकाश चंद्र सेन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.