Kandari shocked by murder: Jalgaon youth killed over minor dispute भुसावळ (6 ऑक्टोबर 2025) : जळगावातील तरुण मित्रांसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे आल्यानंतर त्यांनी मद्य प्राशन केले व त्यानंतर झालेल्या वादातून तरुणाला धारदार शस्त्र भोसकून संपवण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा समोर आली. या घटनेत जितेंद्र राजेंद्र साळुंके (कोळी, 40) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. भुसावळ शहर पोलिसात या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील आरोपींमध्ये जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा बाबू अशोक सपकाळे, दीपक शंकूपाळ व मयूर उर्फ विक्की अलोने यांचा समावेश आहे.
काय घडले कंडारीत ?
मृत जितेंद्र साळुंखे हे चालक म्हणून काम करून आपल्या पत्नी व तीन मुलांसह उदरनिर्वाह करीत होता. जळगाव शहरातील तीन जणांसोबत जितेंद्र हा भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात रविवारी रात्री आल्यानंतर चौघांनी एका हॉटेलमध्ये मद्यपानदरम्यान चौघांमध्ये वाद झाल्यानंतर तिघांनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ व रुग्णालय गाठले. जितेंद्र साळुंखे यांचा मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.
जळगावातील तीन आरोपींविरोधात गुन्हा
खून प्रकरणी मयताची पत्नी ज्योती जितेंद्र सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यता आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकार्यांनी धाव घेतली.