फैजपूरच्या माजी नगराध्यक्षांना शासकीय कार्यालयात प्रवेश बंदी !

फैजपूर, ता. यावल (प्रतिनिधी ) : येथील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश बंदीचे निर्देश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

निलेश उर्फ पिंटू राणे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता तर त्यांच्या विरोधात थेट जिल्हाधिकारी कार्यालयानेच कार्यवाही केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. राणे यांनी 16 जुलै रोजी फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात राणे यांनी कथितरित्या असभ्य वर्तन केल्याने महसूल कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याआधी 15 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात त्यांनी चुकीच्या प्रकारे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महसूल कर्मचारी संघटनांनी या प्रकारांचा निषेध करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते.

या अनुषंगाने निलेश उर्फ पिंटू राणे यांना 19 जुलै ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत यावल व रावेर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.