रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक

पुणे – प्रतिनिधी | पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. रेव्ह पार्टी करणा-यांमध्ये २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून अचानक तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये २ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहेत. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे या दोघांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. रेव्ह पार्टी प्रकरणावर बोलताना खडसे म्हणाले, यात मी कोणाच्याही बाजूला राहणार नाही. यामध्ये षडयंत्र असल्यास समोर आले पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी बोलताना केली आहे.