जळगाव (27 ऑगस्ट 2025) : बसची ट्रीप मारून आलेल्या बस चालकाचा हृदयविकारानेम मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 27 रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.. ज्ञानेश्वर पंडित साळुंखे (42, रा.पिंपळकोठा, ता.एरंडोल) असे मयत बसचालकाचे नाव आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. ते राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत गेली 18 वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
बुधवारी सकाळी त्यांना रवांजा गावाची फेरी करण्यासाठी ड्युटी देण्यात आली. तेथून फेरी पूर्ण करून आल्यावर जळगाव बसस्थानकात दुपारी साडेबारा वाजेला त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी तात्काळ त्यांचा शालक पवन कोळी यांना फोन करून बोलावून घेतले मात्र पवन कोळी हे येईस्तोवर ते चक्कर येऊन कोसळले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. ज्ञानेश्वर साळुंखे यांना मधुमेह होता तसेच बायपासदेखील झाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, बसचालक व वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.