लाखाच्या गांजासह भुसावळातील आरोपी जाळ्यात : यावल पोलिसांची मोठी कामगिरी

Bhusawal accused caught with ganja worth lakhs : Great achievement by Yaval police यावल (29 ऑगस्ट 2025) : यावल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्रिकूटाकडून एक लाखांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली. शहराबाहेर चोपडा रस्त्यावर वनविभागाच्या कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. दोघांनी वाघझिरा येथुन हा गांजा आणल्याची कबुली दिली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वाघझिरा, ता.यावल येथून गांजाची खरेदी करून दोघे भुसावळकडे जात असल्याची गोपनिय माहिती फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरिक्षक अनिल महाजन, उपनिरीक्षक एम.जे.शेख, हवालदार अर्षद गवळी, अमित तडवी, वासुदेव मराठे या पथकास यावल चोपडा मार्गावर सापळा लावण्याच्या सुचना केल्या. सोमवार, 25 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्या सुमारास वाघझिरा कडून दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 4116) द्वारे युसुफ शहा मुलजार शहा (रा.मुस्लीम कॉलनी, ताज हॉटेल, खडका रोड भुसावळ) आणि युनूस सुलतान शेख (रा.गरीब नवाज खडका रोड, भुसावळ, मूळ पत्ता मिठी खाडी निंबायत, सुरत गुजरात) या दोघांना पथकाने शहराबाहेर वनविभाग कार्यालयाच्या समोर पकडले व त्यांच्याकडून चार किलो 60 ग्रम गांजा जप्त केला. गांजा सह इतर साहित्य असा एकूण एक लाख 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विक्रेताही जाळ्यात
आरोपींना हा गांजा वाघझिरा येथून भामसिंग पुट्या बारेला यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली वी यावल पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, कॉन्स्टेबल वसीम तडवी करीत आहे.