Bribery to settle application: Two hotel owners and two police personnel in the net of ACB सोयगाव (29 ऑगस्ट 2025) : सोयगाव ग्रामीण पोलिसात दाखल असलेला अर्ज निकाली काढण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना याच पोलिस ठाण्यातील हवालदार, अंमलदारासह दोन हॉटेल मालकांना छत्रपती संभाजी नगर एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. या कारवाईने पोलिस वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत.

हवालदार राजू मोसम बरडे (36, रा.दयाळ नगर, ता.सोयगाव), अंमलदार रवींद्र रामदास तायडे (38, शिवाजीनगर, आमखेडा ता.सोयगाव), हॉटेल मालक अरविंद बिरबल राठोड (29, जरंडी संत सेवालाल चौक, जरंडी, ता.सोयगाव) व सुनील मुरलीधर सोनोने (53, सोयगाव, जुना बाजार चौक, जि.छत्रपती संभाजीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे लाच प्रकरण
47 वर्षीय तक्रारदाराच्या विरोधात सोयगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अर्ज असल्याने तो निकाली काढण्यात आला व त्या मोबदल्यात कुठलीही कारवाई न केल्याने मोबदला वा बक्षीस म्हणून हवालदार व अंमलदाराने दोन्ही हॉटेल मालकाच्या माध्यमातून 15 हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने फोन पे द्वारे पाच हजार रुपये 28 रोजी पाठवले मात्र त्यानंतरही पैशांची हाव थांबली नाही व उर्वरीत 10 हजार रुपये खाजगी आरोपींच्या माध्यमातून मागण्यात आल्याने गुरुवार, 28 रोजी छत्रपती संभाजी नगर एसीबीला तक्रार देण्यात आली.
गुरुवारी फर्दापूर रोडवरील हॉटेल न्यू मुरली, सोयगाव येथे अंमलदाराने लाच रक्कम हॉटेल मालक अरविंद राठोड यांच्याकडे देण्याचे सांगितल्यानंतर लाच स्वीकारताच चौकडीला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातील मोबाईल व लाच रक्कम जप्त करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबी पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत शिंगारे, पोलिस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे, पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे, हवालदार राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे, सी.एन बागुल आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी करण्यात आला.