Bribe of Rs. 7,000 was taken : ACB arrests bribe-taker from Dhule Municipal Corporation धुळे (11 सप्टेंबर 2025) : धुळे महापालिकेतील स्वच्छता कर्मचार्याची हजेरी लावून पगार नियमित काढण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच स्वीकारताना धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील मुकडदमाला धुळे एसीबीने गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी अटक केली आहे. रवींद्र शामराव धुमाळ (50, रा.भटाई माता रिक्षा स्टॉप, मोहाडी उपनगर, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे धुळे महापालिकेतील आरोग्य विभागात प्रभाग क्रमांक 14 मध्ये सफाई कर्मचारी आहेत. सफाई कर्मचार्यांवर देखरेख करण्यासाठी मुकडदम म्हणून आरोपी रवींद्र धुमाळ आहेत. दैनंदीन हजेरी स्वच्छता निरीक्षकाकडे पाठवण्याचे काम मुकडदमाकडे असून त्यानंतर सफाई कर्मचार्यांना दरमहा पगार अदा केला जातो.
तक्रारदाराचा ऑगस्टचा पगार अदा झाल्यानंतर ते ड्युटीवर असताना पगार काढल्याच्या मोबदल्यात आठ हजार द्यावे लागतील व त्यानंतरच पुढच्या महिन्याचा पगार निघेल, असे धुमाळ यांनी बजावत लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने गुरुवार, 13 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. एसीबीने लाच पडताळणी केल्यानंतर आरोपीला सात हजारांची लाच घेताच पकडण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.