नियंत्रण सुटल्याने चढाआवर ट्रॅक्टर उलटल्याने पिंप्राळ्यातील चालकाचा मृत्यू

Tractor overturns on a hill: Tractor driver dies in Jalgaon जळगाव (12 सप्टेंबर 2025) : सिमेंटच्या गोण्या नेत असताना चढावावर ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला व ट्रॅक्टर उलटले मात्र या ट्रॅक्टर खाली दबले जावून पिंप्राळ्यातील चालकाचा मृत्यू झाला. हरा अपघात शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरात घडला. गणेश मोरसिंग चव्हाण (47, रा.भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृताचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटले
गणेश चव्हाण हे ट्रॅक्टर चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांनी रेल्वे माल धक्क्यावरून ट्रॅक्टर (क्र.एम.पी.68 ए.0646) मध्ये सिमेंटच्या गोण्या भरल्या व सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते अनुराग कॉलनीतील तीव्र चढावावरून जात असताना त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाले. यात गणेश हे ट्रॅक्टरखाली दबले जाऊन गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी कॉन्स्टेबल योगेश माळी, संदीप सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि झुलालसिंग परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून चव्हाण यांना बाहेर काढण्यात आले. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तपासणीनंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले

अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.