Seven gamblers from Kasoda in the crosshairs of the operation कासोदा, ता.एरंडोल (12 सप्टेंबर 2025) : कासोदा पोलिसांनी जुगाराचा डाव रंगात आला असताना कारवाई करीत सात जुगार्यांना अटक केली. आरोपींकडून एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कासोदा गावाजवळच्या बांभोरी शिवारात ही कारवाई गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कासोद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांना बांभोरी शिवारात, गालापूर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतात काही इसम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ पोलिस नाईक अखिल मुजावर, पोलिस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे आणि योगेश पाटील यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून गालापूर रोडजवळच्या नाल्याकाठी काही इसम जमिनीवर घोळका करून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे पाहिले. त्यानंतर, पोलिसांनी अचानक छापा टाकत जुगारींना रंगेहाथ पकडले.
मुद्देमाल जप्त :सात आरोपींना अटक
पोलिसांनी शेख फारुख शेख नबी (50), शेख शहीद शेख रफिक (40), शेख निजाम शेख सिराज (52), तस्लीम सुलेमान खान (57), शेख हमीद शेख शौकत (43), शेख हमीद शेख अमीर (40) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (60, सर्व रा.कासोदा, ता.एरंडोल) यांना अटक केली.
आरोपींकडून तीन हजार 380 रुपयांच्या रोकडसह 22 हजारांचे तीन मोबाईल फोन व एक लाख 40 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी मिळून एक लाख 66 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.