भीषण अपघातात सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू : जळगावात अपघातांची मालिका कायम

Cyclist killed in Jalgaon after being hit by wrong-side Omni जळगाव (16 सप्टेंबर 2025) : चुकीच्या दिशेने (वन-वे) येणार्‍या एका अज्ञात ओमनी कारने सायकलस्वाराला धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. वसंत प्रताप पाटील (70, रा.खंडेराव नगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजता हा अपघत्तत घडला.

काय घडले वृद्धासोबत ?
मंगळवारी सकाळी वसंत पाटील हे सायकलने आपल्या घरी परत जात होते. इच्छादेवी चौकात ते पोहोचले असता, समोरून चुकीच्या मार्गाने येणार्‍या एका ओमनी कारने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वसंत पाटील रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना खाजगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी हनिफा मोमीन यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या अपघाताची माहिती मिळताच वसंत पाटील यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची नोंद जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली.