धुळे (17 सप्टेंबर 2025) : धुळ्यातून बेपत्ता झालेला 15 वर्षीय विद्यार्थी मध्य प्रदेशातील पिथमपूर भागात सापडला आहे. सहा दिवसांपासून हा विद्यार्थी त्याच्या सायकलने प्रवास करीत होता.जयकुमार उर्फ साई जाधव (15, रा.प्लॉट नं.19, केले नगर, देवपूर, धुळे) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

संतापात सोडले घर
10 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता खासगी शिकवणीला जाण्यासाठी निघाला होता मात्र तो तेथे न जाता घरातून निघून गेला होता. पालकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो मिळून न आल्याने त्याच्या कुटूंबियांनी पश्चिम देवपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जयकुमारच्या आईने एका चित्रफितीद्वारे आपल्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले होते.
पोलिसांनीही जयकुमारचा शोध सुरु केला होता. जयकुमारने सायकलीने मध्य प्रदेशातील उज्जैनची वाट धरल्याची माहिती सीसीटीव्ही चित्रणातून पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशाकडे गेले होते. त्यांनी ठिकठिकाणच्या मंदिर परिसरातही त्याचा शोध घेतला.
मोबाईल कॉलनंतर लागला शोध
जयकुमारने एका मालमोटारीच्या चालकाकडून मोबाईल घेऊन इंदूर येथील मामाच्या मुलाशी संपर्क साधला. मी मालमोटारीतून प्रवास करीत आहे, आता मी पिथमपूर येथे आहे, असे त्याने सांगितले. यानंतर मामाने जयकुमार हा एका मालमोटारीत असून त्याचा आताच फोन आला होता, अशी माहिती पालकांना आणि पोलिसांना दिली. त्यामुळे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कापडणीस यांनी तत्काळ चालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.