पळासनेरजवळ दोन ट्रकची जोरदार धडक ; एकाचा जागीच मृत्यू

शिरपूर (17 सप्टेंबर 2025) : शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ दोन्ही ट्रकमध्ये अपघात घडून एकाचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरमधील पळासनेर या ठिकाणी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. धुळ्याच्या दिशेने जाणार्‍या दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. एका ट्रकने बकर्‍या घेऊन जाणार्‍या दुसर्‍या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात ट्रकमधील 70 पेक्षा जास्त बकर्‍यांचा मृत्यू झाला तर अनेक बकर्‍या जखमी झाल्या. पाठीमागून येणार्‍या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इंदुरवरू धुळ्याच्या दिशेने हे दोन्ही ट्रक येत होते. ज्या ट्रकने बकर्‍या घेऊन जाणार्‍या ट्रकला धडक दिली त्यामध्ये मक्याच्या गोण्या होता

दरम्यान, या अपघातानंतर संपूर्ण रस्त्यावर मक्याची पोती पडली. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. दोन्ही ट्रकचे अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला.