पाचोरा शहर व परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तत्काळ मदत देणार ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही

Heavy rains in Pachora taluka : Guardian Minister cries over the tears of the affected people; assures immediate help  जळगाव (22 सप्टेंबर 2025) : पाचोरा शहर व परिसरातील, गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, बाधित झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला या भागात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
पाहणी दरम्यान पालकमंत्री यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांनी प्रत्यक्ष पाण्यात चालत जाऊन आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेत बाधित कुटुंबांना धीर देऊन मदतीचा विश्वास दिला. यावेळी तहसीलदार विजय बनसोडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

साहित्यासह अन्न-धान्याचे नुकसान
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाचोरा शहर व परिसरातील गावांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाल्यामुळे या परिसरातील बर्‍याच घरांमध्ये, दुकानांमध्ये, शेती पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचे, घरातील साहित्याचे, अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातले अहवाल प्राप्त झाल्यावर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आपत्तीग्रस्तांना सर्वोतोपरी मदतीची ग्वाही
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, रविवारी रात्रीपासून पाचोरा तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पाचोरा शहरांमध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. येथील घरांचे, दुकानांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. शासन मदतीसाठी पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार शासनाकडून तात्काळ सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पावसाने हाहाःकार : शेती पिकांचे नुकसान
पाचोरा तालुक्यात रविवारी रात्रभरापासून ते सकाळपर्यंत जवळपास दीडशे मिलिमीटरच्यावर पाऊस झाल्यामुळे या परिसरात शेती पिकाचे, घरांचे, दुकानांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.

जिल्हा प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष
पाचोरा शहरी भागात रविवारी रात्री व आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाचोरा शहरातील जनता वसाहत, बहिरम नगर यासह अन्य भागात नागरिकांच्या घरात, नदीचे पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा, गाळण, नाचनखेडा गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी, नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले असून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. नगरपरिषद, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने एसडीआरएफ पथक आपत्तीग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत करत असून जिल्हा प्रशासन या भागातील परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.