Former minister Eknathrao Khadse’s son-in-law Pranjal Khewalkar granted bail पुणे (25 सप्टेंबर 2025) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना दिड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अटक करण्यात आल्याने त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

काय आहे नेमके प्रकरण ?
पुण्यातील खराडी भागातील एका पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या पार्टीत अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते. त्या पार्टीत काही महिला देखील होत्या. अंमली पदार्थाचं सेवन प्रांजल खेवलकर यांनी केल्याचा दावा यंत्रणेने केल्यानंतर प्रांजल खेवलकरांसह अन्य संशयीतांना अटक करण्यात आली होती व नंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
दीड महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर पुणे सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी खेवलकर यांची येरवडा कारागृहातून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.
पुण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
प्रांजल खेवलकर हे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात बीडच्या एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीनं राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर आरोप केले होते.
दरम्यान, पुणे सत्र न्यायालयानं प्रांजल खेवलकरांसह इतरांना जामीन मंजूर केला आहे. हा प्रांजल खेवलकरांना मोठा दिलासा आहे. आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांची जामीनावर शुक्रवारी सुटका होण्याची शक्यता आहे.