Decomposed body of veterinary officer found in Yaval city यावल (26 सप्टेंबर 2025) : शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या पांडुरंग सराफ नगरात एका घरात शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (48) यांच्या घरातून गुरुवारी सकाळी दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर घरात 48 वर्षीय पशुवैद्यकीय अधिकारी यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. दरम्यान, ते शनिवारपासून घराच्या बाहेर न आल्यामुळे त्यांचा मृत्यू हृदयविकाराने शनिवारी मध्यरात्रीनंतर झाल्याचा अंदाज आहे.

हृदयविकाराने मृत्यूचा अंदाज
शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागातील पांडुरंग सराफ नगरातील आत्माराम रामसिंग पाटील यांच्या घरात यावल शहराचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (48) हे एकटेच वास्तव्यास होते. त्यांच्या घरातून गुरुवारी दुर्गंधी येत असल्याची तक्रार लुकमान पटेल यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार विजय पाचपोळे, वसीम तडवी, राजेंद्र पवार पथकासह दाखल झाले. त्यांच्या घरात डोकावून पाहिले असता घरात कुजलेल्या अवस्थेत भगुरे यांचा मृतदेह आढळला.
फॉरेन्सिक पथकाकडून पाहणी
तत्काळ फॉरेन्सीक पथक बोलावण्यात आले व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, अमोल अडकमोल, भूषण गाजरे यांच्या मदतीने मृतदेह तेथून काढला आणि रुग्णालयात आणण्यात आला व या संदर्भात यावल पोलिसांनी आत्माराम पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.