भुसावळात आठ तासात 52 मंडळांनी केले देवी विसर्जन

Durga Visarjan procession completed in eight hours in Bhusawal भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : भुसावळ शहरातील 188 दुर्गा मंडळांनी मोठ्या उत्साह व जल्लोषात विसर्जन केले तर मुख्य मिरवणुकीत 52 मंडळांनी शिस्तीत सहभाग नोंदवला. शुक्रवारी दुपारी चार वाजेला गंगाराम प्लॉट भागातील साधना दुर्गोत्सव मंडळाची पहिली देवी नृसिंह मंदिराजवळून निघाली. यावेळी डीवायएसपी संदीप गावीत व मुख्याधिकारी राजेद्र फातले यांनी मानाच्या देवीची आरती केली.

नियोजित वेळेत आटोपल्या मिरवणुका
विसर्जन मिरवणुकीला दुपारी चार वाजता सुरूवात झाली. पोलिसांनी रात्री 12 वाजेच्या नियोजित वेळेत मिरवणुकीतील वाद्य बंद केले.विसर्जन मिरवणूक आठ तासांत निर्विघ्न पार पडली. ढोल-ताशांचा गजर व अ‍ॅक्टोपॅडच्या तालावर भाविक थिरकले. गतवर्षी सहा तर यंदा 8 तास विसर्जन मिरवणुकीला लागले.

दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात
शहरात 188 दुर्गांमातांची स्थापना विविध मंडळांकडून करण्यात आली होती. शहरात नवरात्रोत्सवामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी आदी शक्ती दुर्गा मातेला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणूकीत 52 मंडळांनी सहभाग घेतला होता. नृसिंह मंदिरापासून विसर्जन मिरवणूकीला दुपारी सुरूवात झाली.

शहरातील गंगाराम प्लॉट भागातील साधना दुर्गा मंडळ अग्रस्थानी होते.ढोल,ताशे, क्टोपॅड (मिनी डीजे) यांच्या तालावर मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक बेधुंद होऊन नाचत होते. गेल्या वर्षी 41 मंडळांचा विसर्जन मिरवणूकीत सहभाग होता. यंदा मिरवणुकीतील मंडळांची 11ने संख्या वाढली आहे .शहरातील नृसिंह मंदिराजवळून दुर्गेात्सव मंडळांना पोलिसांकडून नंबर दिले जात होते. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी मोठीच गर्दी केली होती. विशेष म्हणजे संध्याकाळी सातनंतर अधिकच गर्दी झाली होती.

136 मंडळांनी केले नदीवर विसर्जन
शहरातील मिरवणुकीत सहभाग नसलेल्या 136 मंडळांतर्फे तापी नदीवर दिवसभर विविध भागातील मंडळांतर्फे दुर्गा मातेचे विसर्जन केले जात होते.

तापी नदीवर प्रकाश व्यवस्था
शहरातील विसर्जन घाट असलेल्या तापी नदीच्या परिसरात पालिकेने प्रखर लाईटाची व्यवस्था केली होती. नदीवर आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात केले होते. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी हे पथक दुपारी 12 वाजेपासून नदीवर कार्यरत होते. शहरात मुख्य मिरवणूक मार्ग,चौकांमध्येही पालिकेने प्रखर प्रकाश देणारे हॅलोजन लाईट लावले होते.

मंडळांना मशिदीजवळ पाच मिनिटांचा वेळ
शहरातील लक्ष्मी चौकातील जामा मशिदीजवळ पोलिसांतर्फे सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत केली होती. मशीदीसमोर एका मंडळाला केवळ पाच मिनिटांचा वेळ पोलिस प्रशासनाने दिला होता. पोलिसांसह आरसीपी प्लॉटून,एलसीबी कर्मचारी, स्थानिक पोलिस यांचा बंदोबस्त होता. बंदोबस्ताचे नियोजन डीवायएसपी संदीप गावीत करीत होते. बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक उध्दव डमाळे हे मिरवणुकीवर लक्ष ठेऊन होते.