Murder of a youth in Jamner taluka : Crime against the trio जामनेर (5 ऑक्टोबर 2025) : जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बुद्रूक येथील प्रदीप कडू चांदणे (32) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी नातेवाईकांनी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी तीन संशयितांविरुध्द जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
प्रदीप चांदणे यांंच्या पत्नी मंगला प्रदीप चांदणे (25, रा. हिवरखेडे बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून संशयित विनोद हरचंद महे, संतोष सोमा जोहरे व गणेश सुरेश काळे (सर्व रा. हिवरखेडे बुद्रुक) यांच्याविरुध्द जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले तरुणासोबत ?
हिवरखेडा गावातील रहिवासी प्रदीपला गुरुवारी रात्री संशयीतांनी घरून नेले. रात्री 12 वाजता संशयित आरोपी घरी आले व त्यांनी विचारले की प्रदीप घरी आला काय? यावर तुम्हीच त्यांना नेल्याचे मंगला हिने सांगितले. त्यावर संशयितांनी वाद घातला आणि धमकी दिली.
रात्री उशिरापर्यंत पती घरी न आल्याने मंगला यांनी शेजारी राहणारे गौतम लोखंडे यांना तपास करण्यास सांगितले. लोखंडे यांनी पाहणी करुन परत येऊन सांगितले की, प्रदीप याचा अपघात झाला आहे व उपचारासाठी जामनेरला नेण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी उपचार घेतांना प्रदीप याचा मृत्यू झाल्याचे समजल्याने त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला.
संशयितांनीच पतीची हत्या केली असल्याचे मंगला चांदणे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी दुपारी चांदणे याच्या नातेवाईकांनी जामनेर पोलिस ठाण्यासमोर रस्त्यावर ठिय्या मांडला. या कारणास्तव काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. फॉरेन्सिक पथक जामनेरात दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील तपास करीत आहेत.