रस्त्यावर हातात कोयता आणि तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला एलसीबीने केली अटक

रस्त्यावर हातात कोयता आणि तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला एलसीबीने केली अटक
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने बोदवड तालुक्यातील शेलवड रस्त्यावर तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयिताला अटक केली आहे.

त्याच्याकडून हत्यारे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोदवड ते शेलवड आणि महालक्ष्मी माता मंदिर, तपोवन रस्त्यावर एक व्यक्ती हातात तलवार व कोयता घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना मिळाली. त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना याबाबत कळवले.

पाटील यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्वरित कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ प्रितम पाटील आणि पोलीस अंमलदार रविंद्र चौधरी यांचा समावेश होता.

पथकाने बोदवड-शेलवड रस्त्यावर छापा टाकला असता, संशयित पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय २६, रा. माळी वाडा, बोदवड) हा तलवार आणि कोयता बाळगून दहशत माजवताना आढळला. त्याच्याकडून ४,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बोदवड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.