अनधिकृत तिकीट दलालांवर बसणार आळा! भुसावळ रेल्वे मंडळाला प्रवासीहितासाठी निवेदन सादर

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया व मुजीब पटेल यांनी भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी प्रवाशांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेऊन लेखी निवेदन सादर करण्यात आले.
या बैठकीस रेल्वे मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी देखील उपस्थित होते. निवेदनात जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी १० ते ११ दरम्यान तत्काळ तिकिट आरक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांना अनधिकृत तिकीट दलालांकडून त्रास दिला जातो, अशी माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधित दलालांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून आरपीएफ निरीक्षकांना तत्काळ पावले उचलण्याचे आदेश चित्रेश जोशी यांनी दिले आहेत.
प्रमुख मागण्या व निर्णय:
बॅटरी कार पुन्हा सुरू होणार:
जळगाव रेल्वे स्थानकावर वर्षभरापासून बंद असलेली बॅटरी कार येत्या एक महिन्यात पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. यामुळे वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे स्थानकावर ‘रेल नीर’चे दर नियंत्रणात यावेत:
स्थानकावरील काही वेंडर्सकडून ‘रेल नीर’ पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढवून आकारले जात आहेत, याची दखल घेत शासकीय दरानुसार विक्रीसाठी नियमन करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील अतिक्रमण हटवले जावे:
जळगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमणामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना अडथळे निर्माण होत आहेत, तसेच यामुळे सुरक्षा धोक्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात मनपा आणि पोलीस विभागाशी समन्वय साधून कारवाईचे आश्वासन दिले.
या चर्चेत जळगावचे यश लोढा आणि आयुष कस्तुरे यांचीही उपस्थिती होती.
या उपक्रमाबाबत बोलताना विराज कावडीया यांनी सांगितले की, “प्रवाशांच्या हक्कांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, ही बाब स्वागतार्ह आहे.”