किनगाव बुद्रुकमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावातील माळीवाडा भागात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
किनगाव बुद्रुक येथील पंकज डिगंबर माळी-महाजन यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर एम.एच. १९ ए.डब्ल्यू. ७४४ क्रमांकाची दुचाकी पार्क केली होती. काही वेळाने त्यांनी दुचाकी हरवलेली दिसल्याने आजूबाजूला सर्वत्र शोधाशोध केली, मात्र दुचाकी कुठेही सापडली नाही.
त्यानंतर त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.