गोवंश तस्करी करणाऱ्यांचा थरारक पाठलाग; पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी, अकोला पोलिसांकडून कार जप्त

जळगाव (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलिसांनीही त्यावर आळा घालण्यासाठी कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत. रविवारी रात्री जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका गोवंश तस्करांच्या वाहनाचा थरारक पाठलाग करताना त्यांना अकोला येथे पकडले. मात्र, या कारवाईत तस्करांनी पाटील यांना चिरडण्याचा प्रयत्न केला, ज्यात ते जखमी झाले आहेत.
संशयित इनोव्हा कार पाहताच सुरुवात झाला पाठलाग
रविवारी रात्री पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक अनिल जाधव आणि चालक दर्शन ढाकणे हे गस्तीत असताना मुक्ताईनगर परिसरात एक इनोव्हा कार संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यात गोवंश तस्करी होत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनाने वेगात पळ काढला.
१५० किमीचा थरारक पाठलाग
मुक्ताईनगरपासून सुरू झालेला पाठलाग मलकापूर, नांदुरा, बाळापूर मार्गे थेट अकोलापर्यंत चालूच राहिला. अखेर अकोलाजवळ पोहोचल्यावर पोलिसांनी इनोव्हा कार ओव्हरटेक करत तिला थांबवले. निरीक्षक संदीप पाटील यांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच चालकाने गाडी रिव्हर्स घेत त्यांच्या अंगावर घातली.
निरीक्षक संदीप पाटील जखमी
या हल्ल्यात संदीप पाटील यांच्या छातीला व बरगड्यांना मार लागला असून पाय व चेहऱ्यावरही जखमा झाल्या. त्यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव केला. दरम्यान, कारमधील तिघे तस्कर वाहन सोडून पळून गेले. जखमी अवस्थेतही पाटील यांनी तातडीने अकोला पोलिसांना याबाबत माहिती दिली.
अकोला पोलिसांकडून तत्काळ नाकाबंदी
अकोला शहर पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी करत संशयित इनोव्हा कार ताब्यात घेण्यात आली. कारच्या आतील तपासणी केली असता एक गोवंश आढळून आला. मात्र, आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. अकोला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गोवंश तस्करांचा हल्ला म्हणजे कायदा व्यवस्थेवर थेट आघात!
या घटनेनंतर पोलिसांवर हल्ला करणे ही अतिशय गंभीर बाब असून, गोवंश तस्करांची वाढती हिम्मत लक्षात घेता त्यांच्यावर कठोर कारवाई आणि व्यापक मोहिम हाती घेण्याची गरज आहे. पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली पाहिजे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.