एलपीजी दरात कपात, पण… फक्त व्यावसायिकांसाठी!

घरगुती गॅसच्या दरात बदल नाही; हॉटेल-रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा
नवी दिल्ली प्रतिनिधी। १ जुलै २०२५ ।
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी दरात मोठा बदल झालेला असला, तरी त्याचा फायदा फक्त व्यावसायिकांना मिळणार आहे. दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्यांकडून एलपीजी दरांचे पुनर्निरीक्षण करण्यात येते. त्यानुसार आजपासून (१ जुलै) १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत तब्बल ₹५८.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार,
दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत ₹१७२३.५० वरून ₹१६६५ झाली आहे.
मुंबईत ती आता ₹१६१६ इतकी झाली असून,
कोलकातामध्ये किंमत ₹५७ रुपयांनी घटून ₹१७६९ झाली आहे.
या अगोदर १ जून रोजीही व्यावसायिक सिलिंडर ₹२४ रुपयांनी स्वस्त झाला होता.
ही दरकपात मुख्यतः हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालकांसारख्या व्यावसायिकांसाठी दिलासादायक आहे. कमर्शियल गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर खाद्यव्यवसायात होत असल्याने त्यांना थेट बचतीचा फायदा होणार आहे.
परंतु, घरगुती गॅस वापरणाऱ्या सामान्य ग्राहकांना मात्र यंदाही कोणतीही सूट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचा मासिक गॅस खर्च तसाच राहणार आहे.
थोडक्यात, ही दरकपात व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी असली, तरी सामान्यांसाठी ती केवळ ‘वेट अँड वॉच’ स्थितीच ठरते आहे.