आषाढी एकादशीनिमित्त ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ उत्साहात 

आषाढी एकादशीनिमित्त ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ उत्साहात 

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे आणि कै. गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिराच्या सहकार्याने आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ या दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात सुमारे ४०० विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेत भक्तीमय वातावरण निर्मिलं.

सोहळ्याची सुरुवात केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई आणि विविध संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. पारंपरिक वेशातील बालकांचे नृत्य, लेझीम आणि टाळ नृत्याने परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले. या नृत्याचे दिग्दर्शन शिक्षक योगेश भालेराव यांनी केले.

पालखी सोहळ्यात दीपक महाजन, सचिन महाजन यांच्या गायनासह अवधूत दलाल यांची संबळ साथ लाभली. यामुळे संपूर्ण सोहळा अधिक रंगतदार झाला. सुमारे तीन किलोमीटरच्या वारीनंतर प्रभात कॉलनीतील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दिंडीचा समारोप झाला.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी संत वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधून त्यांना वारकरी परंपरेची ओळख करून देण्यात आली.

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य आकाश बाविस्कर, दीपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, हर्षल पवार, मोहित पाटील, डॉ. श्रद्धा पाटील तसेच विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.