जळगाव (प्रतिनिधी ) : शहरातील मायटी ब्रदर्सच्या जनरेटर वाहनाची चोरी करून नेल्याची घटना घडली होती. हे वाहन आज नांदुरा शहरापुढे राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त झाल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मिलींद मुकुंद थत्ते यांचे मायटी ब्रदर्स हे गोलाणी मार्केटच्या समोर दुकान असून त्यांचा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे एमएच 19 एस 0666 या क्रमांकाचे वाहन 14 जुलैच्या मध्यरात्री चोरीस गेले होते. चोरट्यांनी वायर तोडून हे वाहन सुरू करून यातील जनरेटर सेटसह पलायन केल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, हेच वाहन नांदुरा शहराच्या पुढे राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त झाले आहे. अर्थात, चोरटे हे वाहन पळवून नेत असतांना त्यांचा हायवेवर अपघात झाल्याची बाब यातून स्पष्ट झाली आहे. यात या व्हॅनच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. यामुळे चोरट्यांनी ही व्हॅन आणि यावरील जनरेटर तेथेच सोडून पळ काढला आहे.