चाळीसगावात गुटखा माफियावर कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव-प्रतिनिधी । तालुक्यातील नागद येतील गुटखा व्यापाऱ्यांवर पोलीस पथकाने छापा टाकून सात लाख 19 हजार 29 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

चाळीसगाव शहरातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, योगेश बेलदार, राहुल सोनवणे, समाधान पाटील व गुन्हे शोध पथकाने बुधवारी सकाळी सातच्या सुमारास हिरापूर रेाडवर राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ एम.एच.41 एयू. 3210 हे महिंद्रा पिकअप वाहन अडवले. यातच गुटख्याचा मोठा साथ आढळून आला.

यात सुमारे 7 लाख 19 हजार 20 रूपये किंमतीचा गुटखा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गुटखा तसेच आठ लाख रुपये किंमतीचे वाहन असा सुमारे 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुटखा दीपक प्रवीणचंद बेदमुथा (रा.नागद, ता.कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर) याचा असून त्याने सांगितल्यानुसार गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे जप्त केलेल्या वाहन चालकाने चौकशीत सांगितले.

वाहन चालक सलीम मुनीर खान (24, रा.ग्रीन पार्क, जारगाव चौफुली, पाचोरा), अरबाज इब्राहीम पठाण (22, रा.सार्वे, ता.पाचोरा) व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रविणचंद बेदमुथा उर्फ जैन (नागद, ता.कन्नड) या तिघांच्या विरोधात जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा झाला आहे.