चाळीसगाव- प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलिसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक करत 14 लाख 57 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही धडक कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली.

गुरुवार, 17 जुलै रोजी रात्री 1 ते 3 दरम्यान पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी केली होती. यावेळी रात्री 2.50 वाजता भडगावहून नांदगावकडे जाणाऱ्या क्रूझर वाहन (एम.एच. 18 बीएक्स 8943) ची तपासणी केली असता, त्याच्या सीटाखाली प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेला 32 किलो 177 ग्रॅम वजनाचा, 2 लाख 57 हजार 416 रुपयांचा गांजा सापडला.
या वाहनातून प्रवास करणाऱ्या राहुल पहाड्या पावरा (वय 23), अक्तारसिंग शिवदास पावरा (24), रवींद्र पंडीत पावरा (20), व पहाडसिंग कुमार पावरा (24). हे सर्वजण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोडंवाड येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी चौघांनाही तात्काळ अटक केली आहे.
या प्रकरणी कॉन्स्टेबल पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी करत आहेत. या कारवाईत एकूण 14 लाख 57 हजार 416 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यात अडीच लाखांचा गांजा आणि 12 लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची क्रूझर गाडी समाविष्ट आहे.
ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, व पोलिस उपअधीक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत एपीआय भरत चौधरी, हवालदार भूपेश वंजारी, नितीन कोल्हे, नितीन वाल्हे, विनोद पाटील, पवन पाटील, निलेश पाटील, प्रवीण पवार, प्रथमेश पाटील, दीपक चौधरी, विजय महाजन या पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.