नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि नैतिक मूल्यांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, हरियाणा सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांचे सक्तीने वाचन सकाळच्या प्रार्थनेत अनिवार्य केले आहे. १७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे दररोज एका श्लोकाचे पठण सर्व सरकारी व खाजगी शाळांमध्ये करण्यात येणार आहे.

हरियाणा शालेय शिक्षण मंडळाने या संदर्भात सर्व शाळांना निर्देश दिले असून, विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, नेतृत्वगुण, विचारशक्ती आणि आत्मसंयम विकसित व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ भिवानी येथील सर्वपल्ली राधाकृष्णन लॅब स्कूलमध्ये मंडळाचे अध्यक्ष डॉ. पवन कुमार यांच्या उपस्थितीत झाला.
डॉ. कुमार म्हणाले की, “गीतेतील तत्वज्ञान विद्यार्थ्यांना जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची दिशा देते. हे वाचन धार्मिक मर्यादेपर्यंत न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरेल.” याआधी उत्तराखंड सरकारनेही ‘आठवड्याचा श्लोक’ या उपक्रमाअंतर्गत असेच पाऊल उचलले होते. तेथे दररोज एक श्लोक अर्थासह वाचण्यात येतो आणि शिक्षक त्याचे स्पष्टीकरण देतात. आठवड्याच्या शेवटी त्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत या प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले आहे, कारण ते भारतीय संस्कृती व मूल्यांचा शिक्षणात समावेश करतात.
हरियाणा शालेय मंडळाच्या सूचनेनुसार, शाळांमध्ये श्लोकासोबत त्याचा अर्थ सूचना फलकावर लिहिला जाणार आहे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या श्लोकाचा भावार्थ समजावून सांगणे अपेक्षित आहे. यामुळे विद्यार्थी श्लोक वाचतीलच, पण त्याचा अर्थ समजून आचरणातही उतरवण्याचा प्रयत्न करतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
या उपक्रमाला गीता अभ्यासक स्वामी ज्ञानानंद महाराज यांच्यासह अनेक आध्यात्मिक संघटनांचा पाठिंबा लाभला आहे. स्वामी ज्ञानानंद म्हणाले, “गीता हा धार्मिक नव्हे तर जीवनाचे मार्गदर्शन करणारा शाश्वत ज्ञानाचा स्रोत आहे.” विशेष म्हणजे, उत्तराखंडमधील या निर्णयाचे स्वागत खुद्द मदरसा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनीही केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “गीता वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता, एकात्मता आणि मूल्यशिक्षण रुजेल.”