भुसावळ- प्रतिनिधी । मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने काल रात्री भाविक विशेष रेल्वेने पंढरपूर येथे रवाना झाले.

जामनेर शहरासह तालुक्यातील सुमारे चार हजार भाविक शनिवारी रात्री विशेष रेल्वे गाडीने पंढरपूरला रवाना झाला. मंत्री गिरीश महाजन यांनी या गाडीची व्यवस्था केली होती. यावेळी भाविकांना निरोप देण्यासाठी स्वतः मंत्री महाजन उपस्थित होते.
जामनेर येथून 60 बसेस तसेच अन्य वाहनांनी हे भाविक भुसावळ रेल्वे स्थानकापर्यंत आले. सर्वांनी स्थानकांवर विठुरायाचा जयघोष केला. रात्री आठ वाजेपासून स्थानकावर भाविकांची गर्दी वाढली. रात्री 9 वाजेपर्यत भुसावळ जंक्शनला जणू यात्रेचे स्वरुप आले. भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले व सहकार्यांनी रस्त्यावर थांबून वाहतूक व्यवस्था चोख ठेवली होती.
शनिवारी रात्री 9.40 वाजता सुटलेली भुसावळ ते पंढरपूर विशेष गाडी रविवारी सकाळी 9 वाजता पंढरपूरला पोहोचेल. यानंतर रविवारी रात्री 9.15 वाजता पंढरपूर येथून निघून ही गाडी सोमवारी सकाळी आठ वाजता भुसावळ जंक्शनवर येईल.