मुंबई ( प्रतिनिधी ) : आधीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आता रोहित पवार यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे पुन्हा गोत्यात आले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी एक व्हिडीओ शेअर केला असून यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चक्क ऑनलाईन रमी गेम खेळत असल्याचे दिसून येत असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विसरा हमी. . .खेळा रमी अशी खिल्ली उडवत कोकाटे यांना मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची मागणी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावर टिका केली. अमित शाहा यांनी चार-पाच मंत्र्यांना काढण्याची सूचना केली असून यात कोकाटे यांचे नाव असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसून रमीची जाहिरात पाहत असल्याचा दावा केला आहे. तथापि, यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.