BJP Secretary Prof. Seema Patil’s demand to the Chief Minister to remove technical difficulties of e-KYC भुसावळ (4 ऑक्टोंबर 2025) : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. या ई-केवायसीमुळे पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल आणि गैरप्रकार थांबतील परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ठप्प झाली असून ईकेवायसी करताना एरर येत आहे तर काही महीलांना ओटीपी येत नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या चिटणीस प्रा.सीमा धिरज पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.

या अडचणींचा करावा लागतोय सामना
लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना खूपच मनस्ताप होत आहे. शहरी भागातही ही समस्या गंभीर असून ग्रामीण भागात परिस्थिती आणखीनच बिकट आहे. केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार नंबर बंधनकारक करण्यात आले आहे. पंरतु बर्याच लाभार्थ्यांना पती हयात नाहीत किंवा वडील देखील नाही. त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की, केवायसी करताना आधार नंबर कुणाचा टाकायचा. त्यांच्यासाठी सरकारने तात्काळ वेगळा तोडगा काढणे गरजेचे आहे.
लाभापासून कुणीही वंचित राहू नये: प्रा. सीमा पाटील
सरकारने ई-केवायसीसाठी दोन महिन्यांचा ठरावीक कालावधी दिला आहे. कागदपत्रे सादर करूनही केवळ तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या त्रासातून मुक्तता मिळावी, अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे. लाभापासून कुणीही गोरगरीब आणि गरजू पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी शासन व संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन ई-केवायसीची वेबसाईट सुरळीत कार्यरत करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रा.पाटील यांनी केली आहे.