नवी दिल्ली-वृत्तसेवा | देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज रात्री आकस्मीकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्याच्या कारणावरून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. यामागील कारण म्हणून त्यांनी आरोग्याच्या समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याला कारणीभूत ठरवले आहे. धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ‘‘आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे, जो तात्काळ प्रभावाने लागू होईल.’’
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले की, आरोग्यविषयक अडचणी आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत त्यांनी संविधानाच्या अनुच्छेद ६७(अ) अंतर्गत आपला राजीनामा सादर केला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात धनखड म्हणाले आहेत की, ‘‘आरोग्याला प्राधान्य देत आणि चिकित्सकांचा सल्ला मान्य करत मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे.’’
यासोबतच त्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण नातेसंबंधासाठी आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता.