मुक्ताईनगर- प्रतिनिधी | खामखेडा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणातील घोळाबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले असून यात आज आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक करून नंतर मुक्तता करण्यात आली आहे.

सध्या इंदूर ते हैदराबाद महामार्गाचे काम सुरू असून यात खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. आज या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यानंतर वातावरण चिघळले. यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात आणले गेले.
यानंतर आमदार चंद्रकांत पाटील आणि अन्य आंदोलन शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आली. तर यामुळे मुक्ताईनगर येथे पडसाद उमटले असून शहरात तातडीने बंद पुकारण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता मुक्ताईनगर शहर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. येथे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आमदार पाटील यांना पाठींबा दर्शविला.