चाळीसगाव- प्रतिनिधी | महामार्ग पोलिसांनी एका कारमधून तब्बल साठ कोटी रूपये मूल्य असणारे अँफेटामाईन या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आमदार मंगेश चव्हाण यांनी वर्तवली आहे.

काल सायंकाळी चाळीसगाव जवळ असलेल्या कन्नड घाटात महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एक ब्रेझा कार ही धुळ्यावरून कन्नड घाटाच्या मार्गाने छत्रपती संभाजी नगरकडे निघाली होती. यात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असलेल्या कन्नड घाटात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यात ब्रेझाच्या चालकाकडे कागदपत्र नव्हते. तर कारच्या मागील बाजूस दोन बॅगा आढळून आल्या. याची तपासणी केली असता यामध्ये अँफेटामाईन हे ड्रग्ज आढळ्ले.
पोलिसांनी हा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. यात 39 किलो साठा असून याचे बाजारातील मूल्य तब्बल साठ कोटी रूपये असल्याचे आढळून आले. यामुळे त्या कार चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्याची ही पहिलीची वेळ असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणी मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.