जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपमधील दोन ज्येष्ठ नेते समोरासमोर आले आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात प्रफुल्ल लोढा प्रकरणावरून वाक्युद्ध चांगलेच रंगले आहे. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंचा प्रफुल्ल लोढासोबतचा एक फोटो एक्सवर शेअर करत खळबळ उडवून दिली. महाजन यांनी फोटो शेअर करत विचारले की, तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? तसेच ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ असा सवाल करत राजकीय गोटात चर्चा सुरू केली.

महाजनांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रफुल्ल लोढा खडसेंना गुलाबी फुलांचा बुके देताना दिसत आहेत. या फोटोवर आता खडसेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खडसे म्हणाले की, त्या काळात प्रफुल्ल लोढाकडे मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरोधात गंभीर आणि अश्लील गोष्टी असल्याचे त्यांना कळवण्यात आले होते. त्यामुळेच लोढाशी त्यांची भेट झाली. खडसे पुढे म्हणाले की, लोढा आणि आपण एकाच गाडीतून प्रवास करत होतो आणि त्यावेळीच या सर्व गोष्टी समोर आल्या. इतकेच नाही तर लोढाकडे महाजन आणि नाईक यांची सीडी असल्याचे त्यांना सांगितले गेले होते, असा दावाही खडसेंनी केला.
यापुढे खडसे म्हणाले की, मंत्री महाजनांनी तीन महिने मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रफुल्ल लोढाचे पाय चेपल्याचे लोढाच म्हणाले होते. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे. महाजनांनी जो फोटो ट्विट केला तो फोटो बोलका नसून खरे बोलके फोटो ट्विट करावेत, असे टोला खडसेंनी लगावला. भाजप आता भ्रष्ट नेत्यांना पक्षात स्थान देत असल्याचा आरोप करत खडसे म्हणाले की, जे पक्षासाठी झुंजले त्यांना मात्र बाजूला केले जात आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘मी तुमच्यासारखा मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे फिरत नाही, कुणाचेही पाय चाटत नाही. देवा भाऊंचे पाय चाटण्याचे काम मला जमत नाही.’ भाजपमधून बाहेर पडण्यामागे गिरीश महाजन यांच्या कटकारस्थानाचा मोठा हात असल्याचा दावाही खडसेंनी यावेळी केला. या सर्व आरोप-प्रत्यारोपामुळे जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पुढे या प्रकरणाचे राजकीय पडसाद किती दूर जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.