चोपडा — चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सज्जनसिंह नार्हेडा यांना अमानुष वागणुकीच्या प्रकारानंतर निलंबित करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून तिघा तरुणांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीच्या नावाखाली या तरुणांना कपडे काढायला लावून पट्ट्याने मारहाण करण्यात आली तसेच त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.
याच प्रकरणात एका महिलेलाही अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पीडित कुटुंबीय आणि एका सामाजिक संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.