जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी उभारले जाणार ८५० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव — शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ८५० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १५३ उपकेंद्रांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असून सध्या ६८ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित आहेत.

या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात टास्क फोर्सची बैठक झाली. महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी या प्रकल्पांना गती देण्यासाठी लोकसंवाद वाढवण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करून गैरसमज दूर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या योजनेमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांसाठीही हे मॉडेल दिशादर्शक ठरणार आहे. पुढील टप्प्यात प्रकल्पांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून भूसंपादनास वेग देण्यात येणार आहे.