जळगाव — रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांपासून पाच घरफोड्यांमध्ये सहभागी असलेला मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

संशयित आरोपीने आपल्या साथीदारांसह शिरसोली प्र.न. परिसरात घरफोड्या केल्या होत्या. यापूर्वी सागर डोईफोडे या आरोपीला अटक करण्यात आली होती. चौकशीत शाहचे नाव समोर आल्यानंतर तो पोलिसांना चकवा देत सुरतला फरार झाला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने रविवारी सिंधी कॉलनी परिसरात सापळा रचून जुनेदला अटक केली. या कारवाईत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाने सहभाग घेतला. आरोपीकडून पुढील तपास सुरू असून त्याचे साथीदार अजूनही फरार असल्याची माहिती मिळत आहे.