जळगाव जिल्ह्यातील ७९५ रुग्णांना ६.९९ कोटींची मदत !

जळगाव- प्रतिनिधी । गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी एक महत्त्वाचा आधार बनला आहे. नाशिक विभागात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत तब्बल ३,५४२ रुग्णांना एकूण ३२ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी जळगाव जिल्ह्यातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाख ४५ हजार रुपयांची भरीव मदत मिळाली असून, ही आर्थिक मदत त्यांच्या उपचारासाठी जीवनदायिनी ठरली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात पेपरलेस व डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात प्रत्यक्ष हेलपाटे घालण्याची गरज राहिलेली नाही. जिल्हास्तरावरच सहाय्यता कक्ष सुरू केल्यामुळे अर्जप्रक्रिया अत्यंत सुलभ झाली असून, रुग्णांना कमी वेळेत, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने मदतीचा लाभ मिळत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत एकूण २० गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये कॉक्लियर इम्प्लांट (वय २-६ वर्षे), हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, मेंदूचे आजार, नवजात शिशूंच्या आजारांवरील उपचार, भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त रुग्ण यांसारख्या आजारांचा समावेश आहे. गरजू रुग्णांना आवश्यक त्या उपचारांची मदत वेळेत आणि त्यांच्या आवाक्यात मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

मदतीसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे लागतात, ज्यात आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक), वैद्यकीय अहवाल, खर्चाचे प्रमाणपत्र, जिओ-टॅग फोटो (रुग्ण दाखल असल्यास अनिवार्य), संबंधित रुग्णालयाची संगणक प्रणालीवरील नोंद, अपघातप्रकरणी पोलीस डायरीची नोंद आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रसंगी ZTCC नोंदणी पावती यांचा समावेश आहे. सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात तयार करून aao.cmrf-mh@gov.in या ईमेल पत्त्यावर पाठवावी लागतात. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक 1800 123 2211 वर संपर्क साधता येतो.

या योजनेमुळे जळगाव जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना आरोग्यसेवेसाठी मोठा दिलासा मिळाला असून, अनेक रुग्णांना वेळेवर उपचार घेता आले आहेत. ही योजना खऱ्या अर्थाने गरजूंना नवजीवन देणारी ठरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “पेपरलेस प्रणाली, डिजिटल तंत्रज्ञान आणि जिल्हास्तरीय कक्षांमुळे गरजू रुग्णांना सहज मदत पोहोचवणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे रुग्ण व नातेवाईकांच्या समस्या सोडविणे आता अधिक सुलभ झाले आहे. अर्ज करणे आणि आर्थिक मदत मिळवणे पूर्वीपेक्षा खूप सोपे बनले आहे.” या योजनेमुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे ध्येय प्रत्यक्षात साकार होत आहे.