मुक्ताईनगर येथे नाथाभाऊंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

मुक्ताईनगर-प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षच्या विधानसभा क्षेत्र कार्यालयात ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. भाजपने खडसे यांच्या प्रतिमेवर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले.

अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत नाथाभाऊंनी रूपालीताई चाकणकर यांचा १३ वेळा आदराने ‘ताई’ असा उल्लेख केला होता. मात्र, भाजपने या विधानाचा विपर्यास करून असत्याचा प्रचार केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. भाजपला प्रफुल्ल लोढा यांनी उघडकीस आणलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातील पराभवाचा राग मनात ठेवून, असत्यावर आधारलेले हे आंदोलन रचल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी ‘सत्य कधीही लपवता येत नाही, आणि राजकारणाच्या नावाखाली असत्याचा खेळ चालणार नाही,’ असा ठाम संदेश देण्यात आला. सत्याच्या समर्थनार्थ आणि अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत, मुक्ताईनगर शहर व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. नाथाभाऊंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना एकजुटीचे प्रतीकात्मक समर्थन देण्यात आले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून, भाजपने केलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीने या दुग्धाभिषेकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.