जळगाव- प्रतिनिधी । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे.

भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या. जळगाव स्थानकावर खासदार उज्वल निकम, खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश (राजीव मामा) भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी एकाच वेळी बेंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचाही शुभारंभ केला.
नागपूर (अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचे अंतर जवळपास १२ तासात पूर्ण होईल. ही गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड स्थानकांवर थांबत पुण्याला पोहोचेल. दोन्ही स्थानके फुलांच्या तोरणांनी, पताकांनी सजवण्यात आली होती आणि प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय झाले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नगर-पुणे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्याचा नगर-दौंडमार्गे होणारा १०० ते १२५ किमीचा अतिरिक्त फेरा टाळण्यासाठी थेट मार्ग विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा ११ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. ही ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (मंगळवार वगळता) सकाळी ६.२५ वाजता सुटून सायंकाळी ६.२५ वाजता अजनी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (सोमवार वगळता) सकाळी ९.५० वाजता सुटून रात्री ९.५० वाजता पुण्यास पोहोचेल.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत ट्रेन भारताच्या प्रगत तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, ‘एक भारत जोडलेला भारत’ या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे. या सेवेमुळे धार्मिक स्थळे, व्यापार, पर्यटन व रोजगाराच्या संधींना चालना मिळून विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.