पिंप्राळ्यात गाईची ओटी भरून डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

जळगाव- प्रतिनिधी | पिंप्राळा गावात महिलांच्या पुढाकाराने गाईची ओटी भरून डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला. गायीच्या मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी आयोजित या उपक्रमाने गावात चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

संत सेना महाराज मंदिर परिसरातील विकास पाटील यांच्या गायीस सात महिने पूर्ण झाल्याने, त्यांच्या कुटुंबियांसह परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने हा सोहळा केला. मंगल वातावरणात फुलं, हार, नैवेद्य, व पारंपरिक जेवणाद्वारे गायीचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन गायीला ओटी भरली, मंगलगाणी गाऊन तिचे पूजन केले आणि डोहाळे जेवणाचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे गावात ऐक्य, परंपरा आणि पशुप्रेमाचा संदेश पसरला. याप्रसंगी विलास पाटील, अर्चना पाटील, अश्विनी पाटील, कीर्ती पाटील, सविता पाटील, वैशाली पाटील, पूनम पाटील व उर्मिला पाटील यांची उपस्थिती होती.