जळगाव- प्रतिनिधी | काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रतिभाताई शिंदे या आदिवासींच्या झुंजार नेत्या समजल्या जातात. त्यांच्या पाठीशी आदिवासी समुदायाची मोठी ताकद असून त्या पुरोगामी चळवळीत देखील सक्रीय आहेत. गत लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. यानंतर पक्षाने त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष हे मोठे पद देखील त्यांना दिले होते. मात्र काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळे त्यांना त्रास झाला. यामुळे त्या पक्षाचा त्याग करतील अशी चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, आज प्रतिभाताई शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आधीच गटबाजीमुळे पोखरलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर, प्रतिभाताई या लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील असे मानले जात आहे. सूत्रांच्या मते, त्या लवकरच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सहभागी होण्याची शक्यता आहे.