जमावाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू : परिसरात तणाव

जामनेर- प्रतिनिधी | कॅफेत अल्पवयीन मुलीसोबत बसलेल्या तरूणाचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील 22 वर्षीय तरुण सुलेमान पठाण याचा कॅफेत अल्पवयीन मुलीसोबत बसल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत मृत््यूा झाला. ही घटना घडताच परिसरात तणाव निर्माण झाला होता. तथापि, पोलिसांनी सतर्कता दाखवून कडक बंदोबस्त लावल्याने वातावरण नियंत्रणात आले.

सुलेमान पठाण हा एका अल्पवयीन तरूणीच्या सोबत बसल्याची माहिती मिळताच तरूणांच्या घोळक्याने त्याला मारहाण केली. त्याने तेथून घरी जाण्याचा प्रयत्न केल्यावर या जमावाने त्याचा पाठलाग करत पुन्हा मारहाण केली. यात त्या तरूणाचा मृत्यू झाला. मयत सुलेमान पठाण याच्या पार्थिवासह आप्तांनी आंदोलन सुरू केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले. शेवटी पोलिसांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्याने हा तणाव नियंत्रणात आला.

या प्रकरणी मयत सुलेमान पठाण यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी कुणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.