यावल (27 ऑगस्ट 2025) : शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या बाहेर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी 68 वर्षीय वृद्ध महिलेच्या पिशवीतील 60 हजारांची रोकड सोमवारी दुपारी लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी यावल पोलिसात मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले यावल शहरात
शहरात सातोद रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत सुशीला दामू तेली (68, रा.कोळवद, ता.यावल) या महिला आल्या होत्या. त्यांनी बचत गटाकडून मिळालेले 60 हजार रुपये बँकेतून काढले व पिशवीत ठेवली आणि त्या बँकेच्या बाहेर आल्या. याचवेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीला कशाने तरी कट मारून पिशवीतून 60 हजारांची रोकड लांबवली.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सदर वृद्ध महिलेने आपल्या घरी हा प्रकार कळवला. याप्रकरणी यावल पोलिसात मंगळवारी सुशीला तेली यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक सारिका वाणी करीत आहे.