दही-हंडीत दहा थरांचा विश्वविक्रम करून रचला इतिहास !

ठाणे- प्रतिनिधी । आज मुंबईतील कोकणनगर गोविंदा पथकाने दहा थरांचा विश्वविक्रम करून इतिहास रचला आहे.

१६ ऑगस्टचा दिवस. सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. पण गोविंदांचा उत्साह मात्र ढगांपलीकडे गेला होता. हजारो प्रेक्षक ठाण्यात जमले होते. डोळ्यांत कुतूहल, हृदयात उत्सुकता आणि तोंडात जयघोष घेऊन लोकांनी दहीहंडीचा सोहळा अनुभवायला सुरुवात केली.

ढोल-ताशांच्या गजरात जेव्हा कोकणनगर गोविंदांनी एकामागोमाग एक थर रचत नेले. तेव्हा संपूर्ण मैदान श्वास रोखून पाहत होतं. सात, आठ, नऊ… आणि मग तो क्षण आला, जेव्हा दहाव्या थरावर लहानसा गोविंदा उभा राहिला. आकाश फाडून दणाणून आवाज घुमला –
“गोविंदा आला रे आला!”

हा पराक्रम ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात घडला. उपस्थित मंत्री प्रताप सरनाईक आणि हजारो प्रेक्षकांनी या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होते, थरांच्या गगनचुंबी रचनेला सलामी दिली. २५ लाख रुपयांचं भव्य पारितोषिक कोकणनगर पथकाला देऊन या क्षणाची सुवर्ण नोंद झाली. गर्दीत आनंदाश्रू तरळले, जयघोष आकाशाला भिडले, आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला.

याआधी ९ थर हा मर्यादेचा टप्पा मानला जात होता. जय जवान आणि इतर पथकांनी नऊ थरांची किमया साधली होती. पण कोकणनगर पथकाने तो विक्रम मोडून नवा कीर्तिमान प्रस्थापित केला.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रो गोविंदा स्पर्धेत कोकणनगर पथकाने १० थरांचा प्रयत्न केला होता, पण अखेरच्या क्षणी थर कोसळले. त्या वेळी पारितोषिक गमावलं, पण हार मानली नाही. मनाशी पक्कं ठरवलं की “यंदाच्या दहीहंडीत इतिहास घडवायचाच!” आणि आज त्यांनी तो संकल्प पूर्ण केला.