भुसावळ हादरले : निवृत्त पोलिसाला पत्नीसह मुलींकडून ठार मारण्याचा प्रयत्न ; तिघांना बेड्या

Bhusawal shaken : Attempt to kill retired policeman by wife and daughters; Three arrested भुसावळ (27 ऑगस्ट 2025) : शहरातील विघ्नहर्ता कॉलनी, घोडेपीर दर्गा परिसरात घराच्या वादातून लोहमार्ग पोलिस ठाण्यातील निवृत्त पोलिस कर्मचार्‍याला मारहाण करत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात रविवार, 24 रोजी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांमध्ये पत्नी, मुलीसह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष शंकरराव चिखलकर (68, भुसावळ) हे निवृत्त पोलिस आहेत. ते आपल्या घरात असताना संशयीत संतोष सुखदेव अटवेकर व सखुबाई सुखदेव अटवेकर यांनी हे घर तुमचे नाही, तुम्हाला येथे राहण्याचा अधिकार नाही या कारणावरून वाद घालत लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर चिखलकर यांच्या गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादी सुभाष चिखलकर गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अहवालाच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

या संशयीतांविरोधात गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी संगीता सुभाष चिखलकर, संतोष अटवेकर, नेहा सुभाष चिखलकर, सखुबाई सुखदेव अटवेकर, गजानन अटवेकर आदींवर आर्म अ‍ॅक्ट यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून तिघांना अटक केली. उर्वरित संशयीतांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.