भुसावळ (27 ऑगस्ट 2025) : आगामी गणेशोत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, कोणीही अफवा पसरवू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, कायदा-हातात घेणार्यांची गय केली जाणार नाही, असे जळगावचे अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी येथे सांगितले. आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर सोमवार, 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.30 ते 8.35 या वेळेत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात शांतता समिती व महिला दक्षता समितीची बैठक पार पडली. शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्षांसह सुमारे 400 ते 450 सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
या बैठकीस उपविभागीय पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, नगरपालिकेचे वैभव पवार, पंचायत समितीचे सचिन पाठक, एस.टी.महामंडळाचे किशोर नेवे, एमएसईबीचे अभियंता नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रशेखर तायडे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. शहर पोलिस निरीक्षक उद्धव ढमाळे व तालुका पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.
कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी
बैठकीत गणेशोत्सव उत्साहात, पण शिस्तबद्ध व सुरक्षितरीत्या पार पाडावा यासाठी सूचना देण्यात आल्या. ईद-ए-मिलादसंदर्भातही आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले.