जळगावातील ‘शहनशाह ट्रॅक्टर अ‍ॅण्ड अर्थ मुव्हर्स’मधून 14 हजारांचे बनावट साहित्य जप्त

जळगाव (27 ऑगस्ट 2025) : जळगावातील एस.टी. वर्कशॉपसमोरील ‘शहनशाह ट्रॅक्टर अ‍ॅण्ड अर्थ मुव्हर्स’ या दुकानातून 13 हजार 615 रुपयांची बनावट उत्पादने जप्त करण्यात आली. या प्रकरणी दुुकान मालक दीपक नंदलाल पोपली (32, रा. गणपती नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट ट्रॅक्टरचे सुटे भाग (पार्ट्स) विक्री होत असल्याची माहिती मिळासल्यानंतर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दीपक पोपली यांच्या दुकानात महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या नावाचा गैरवापर करून ट्रॅक्टरचे सुटे भाग विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार, कंपनीचे अधिकारी हंबीरराव ज्ञानू साठे (61, रा. मुंबई) यांनी शनिपेठ पोलिसात फिर्याद दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुकानाची तपासणी केली. तपासणीत महिंद्रा कंपनीचे नाव असलेले बनावट ऑईल फिल्टर, एअर फिल्टर आणि कापडी हूड असे साहित्य आढळून आले.

पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट साहित्याची एकूण किंमत 13 हजार 615 रुपये आहे. या प्रकरणी दुकानमालक दीपक पोपली याच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बनावट साहित्य विकून ग्राहकांची फसवणूक करणार्‍यांना एक कठोर संदेश मिळाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साजीद मन्सुरी करत आहेत.